आ.सतीश चव्हाण उस्मानाबाद मधून लढणार?

Foto

औरंगाबाद- नवीन वर्षात आगमन होताच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तिकीट मिळविण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छूक उमेदवार जोरात तयारीला लागले आहेत. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांना उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांचा पराभव झाल्यामुळे ते यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आ.चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.

आमदार सतीश चव्हाण यांना सध्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यानुसार त्यांची तयारी देखील चालू आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीला सुटला नाही तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची योजना आमदार चव्हाण यांनी आखल्याचे समजते आहे. त्यानुसार चव्हाण यांची तयारी चालू झाल्याचे कळते आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील काही महत्वाच्या नेत्यांच्या गाठी भेटी हि त्यांनी घेतल्याचे समजते आहे.

उस्मानाबाद मतदार संघाचा विचार करता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते स्थानिक पातळीवर कायम एकमेकांच्या विरोधात असतात. एकवेळ शिवसेनेला मदत पण राष्ट्रवादीला नाही, अशी भूमिका सतत पाहवयास मिळत असते. त्यामुळे पद्मसिंह पाटील यांच्या घरातल्या उमेदवारी पेक्षा सतीश चव्हाण यांना काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. तुळजापूर मध्ये काँग्रेसचे मधुकर चव्हाण आमदार आहेत. त्या मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. परंतु काँग्रेस आमदार मधुकर चव्हाण आणि सतीश चव्हाण यांचे वडील भानुदास चव्हाण यांचा दोस्ताना खूप जुना आहे. त्यामुळे सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीला मधुकर चव्हाण आणि काँग्रेसचे काही नेते हे अनुकूल असल्याचे स्थानिक पातळीवरून समजते आहे.

काँग्रेसच्याच काही नेत्यांनी सतीश चव्हाण यांना तिकीट देऊन नवीन प्रयोग करण्यात यावा असे सुचविले असल्याचे देखील समजते आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आमदार सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे समजते आहे. त्याच बरोबर बार्शीचे आमदार दिलीप सोपल, वाशी- भूम- परांडा आमदार राहुल मोटे, उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह यांना विचारात घेतल्याशिवाय उस्मानाबाद लोकसभेचे तिकीट दिले जाणार नाही. त्यामुळे आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा असली तरी नेमके तिकीट कोणाला मिळणार हे तरी अद्याप गुलदस्त्यात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker